“आमची लढाई अतृप्त आत्म्यांच्या विरोधात“ नेमकं काय म्हणाले संजय राऊत...
“आमची लढाई अतृप्त आत्म्यांच्या विरोधात“ नेमकं काय म्हणाले संजय राऊत...
img
Dipali Ghadwaje
राज्यात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. नेत्यांच्या प्रचार सभा बैठका सुरु असताना, एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या देखील सुरूर आहे. अशातच  पुण्यातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख अतृप्त आत्मा असा केला होता. या टीकेला आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

दरम्यान ते म्हणाले की,  मराठी माणसाचे जे शत्रू आहेत, मराठी माणसाने ज्यांना गाडलं असे अतृप्त आत्मे भटकत आहेत. त्यात गुजरातच्या अतृप्त आत्म्याची भर पडली आहे असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. नरेंद्र मोदी म्हणजे गुजरातचा अतृप्त आत्मा आहेत असा उल्लेख त्यांनी केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“महाराष्ट्र अतृप्त आत्मे भटकत असले तरीही त्यांना घाबरत नाही. महाराष्ट्रात ढोंग, अंधश्रद्धा, फेकाफेकी चालत नाही. महाराष्ट्र हा पवित्र आत्म्यांचा प्रदेश आहे. छत्रपती शिवरायांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सुपुत्र जन्माला आले. मोदीजी पुण्यात होते त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख तरी केला का? कारण त्यांना डॉक्टर आंबेडकरांवर राग आहे. संविधान बदलायचे आहेत म्हणून हे आत्मे भटकत आहेत. मोदी काय म्हणत आहेत त्याकडे लक्ष देऊ नका. १०५ आत्मे ज्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान केलं ते मोदींना शाप देणार आहेत. मोदींनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं जितकं नुकसान केलं तेवढं कुणी केलं नसेल.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“अतृप्त आत्म्यांच्या विरोधात आमची लढाई आहे. उद्या महाराष्ट्रातल्या १०५ हुतात्म्यांना आम्ही आदरांजली वाहू आणि त्यांना सांगू की या अतृप्त आत्म्यांचा बदला घेऊ. भटकता आत्मा जर पंतप्रधानपदी बसला तर राज्याची भुताटकी आणि स्मशान होऊन जाईल. लोकशाहीत पाच चेहरे असले तर काय बिघडलं? आम्ही पंतप्रधान लादणार नाही. ” असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींना उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

“आपल्याकडे म्हणतात काही अतृप्त आत्मा असतात. त्यांची स्वप्नं पूर्ण झाली नाहीत, त्यामुळे ते दुसऱ्यांच्या स्वप्नांमध्येही माती कालवतात. ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. हे फक्त विरोधी पक्षालाच अस्थिर करत नाही तर आपल्या पक्षात, कुटुंबातही ते असंच करतात. १९९५ मध्येही हा अतृप्त आत्मा शिवसेना भाजपाचं सरकार अस्थिर करु पाहात होता. २०१९ मध्ये या अतृप्त आत्म्याने काय केलं ते महाराष्ट्राला माहीत आहेच. आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न या अतृप्त आत्म्याने सुरु केला आहे” असं म्हणत नरेंद्र मोदींनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. त्यावर आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group