आठशे कोटींच्या भूखंड घोटाळ्याबाबत ना. दादा भुसे यांनी केले हे खुलासे
आठशे कोटींच्या भूखंड घोटाळ्याबाबत ना. दादा भुसे यांनी केले हे खुलासे
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महानगरपालिकेत जो आठशे कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाला आहे, त्याला खा. संजय राऊत हेच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप ना. दादा भुसे यांनी केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत शिवसेनेच्या नेत्यांनी आरोप करताना आपली पायरी ओळखून राहावे; अन्यथा आम्हालाही त्यांच्याबाबतची सर्व माहिती जनतेसमोर मांडावी लागेल, असाही इशारा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे शिवसेना गटाचे नेते ना. दादा भुसे यांनी दिला आहे.

नाशिक महानगरपालिकेत आठशे कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे खा. संजय राऊत यांनी केला होता, त्याबाबत खुलासे करण्यासाठी नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे, भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश गिते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, राजू लवटे आदींनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ना. दादा भुसे म्हणाले, की नाशिकमधील घडामोडी त्यांच्या सल्ल्यानेच होत होत्या. हा घोटाळा संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच झाला आहे.

यावेळी बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांनी सांगितले, की ज्या ज्या वेळी संजय राऊत नाशिकला येत होते, त्या त्या वेळी ते जसे आदेश देत होते, त्या पद्धतीप्रमाणे आम्ही ठराव करून राज्य शासनाच्या मंजुरीला पाठवत होतो. यामध्ये आमची कोणतीही चुकी नाही. कारण संजय राऊत हे सध्या महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यापूर्वी ते भाजप-शिवसेना युतीमधील प्रमुख नेते असल्यामुळे आम्हाला त्यांचा आदेश हा पाळावा लागत होता. यामध्ये आमची कोणतीही चुकी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेत दरवर्षी २० टक्के निधी भूसंपादनासाठी राखीव ठेवण्यात येतो. आम्ही कोणताही घोटाळा केलेला नसल्याचा खुलासा गणेश गिते यांनी केला. आम्ही जर घोटाळा केला असता, तर त्यावेळीच आता आरोप करणार्‍यांनी आक्षेप घ्यायला हवा होता किंवा भूसंपादनाला स्टे आणायला हवा होता.

त्यावेळचे शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनीच हा प्रस्ताव मंजूर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक खुलासा गिते यांनी केला. त्याबाबतचे पत्रही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखविले. ज्यावेळेस हे प्रकरण झाले, तेव्हा महापालिकेच्या स्थायी समितीवर सुधाकर बडगुजर यांच्यासह शिवसेनेचे चार सदस्य होते. त्यांनी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही? असा सवाल गणेश गिते यांनी उपस्थित केला. आम्हा कोणालाच भेटलो नाही. आमचे काम पारदर्शक आहे. आम्हाला निरोप यायचा की साहेबांनी हे काम करायला सांगितले आहे. ही केस आम्ही करत नव्हतो. त्यांनी आमच्याकडे खुलासा मागून ही केस करायला लावली. त्यांनी आणखी एक केस आणली. मात्र ती मंजूर करण्यास मी नकार दिल्याने, बडगुजर यांनी स्थायीत गोंधळ घातला. याबाबत आम्ही आधीच खुलासे दिले आहेत. त्यांच्या मुखपत्रात का त्यांनी तेव्हा बातमी छापली नाही.

यासंदर्भात बोलताना शिंदे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी संजय राऊत आणि त्यांचे नाशिकमधील इतर सहकारी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, की या सर्व परिस्थितीला संजय राऊत आणि त्यांचे नाशिकमधील बगलबच्चे हे जबाबदार आहेत. कारण त्यांनी हे केले आहे. आता त्यांना काय झाले, की अचानक यामध्ये भ्रष्टाचार झाला, घोटाळा झाला, आत्ताच का आठवलं? कारण कुठं तरी काही तरी बिनसलं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करून निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण दूषित करण्याचे काम करीत असल्याचा आरोपदेखील बोरस्ते यांनी यावेळी केला. लाभार्थी उबाठा गटाचे अनेक नेते असल्याचे त्यांनी सांगितले.

बडगुजर हे मनपा लुटायचेच काम करत आहेत. बडगुजर अ‍ॅण्ड कंपनीने कोरोना काळातही स्मशानभूमीही सोडली नाही. पथदिपापासून ते मेंटेनन्स पर्यंत बडगुजर अ‍ॅण्ड कंपनीच काम करते आहे. या चोराच्या उलटा बोंबा आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group