मागील काही काळापासून काँग्रेस पक्षाला एका मागोमाग एक धक्का बसत आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडली आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर वाढलेले राजीनामे काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते सुशील बंदपट्टे यांनीराजीनामा देत अवघ्या काही मिनिटांत भाजपकडून उमेदवारी मिळवल्याने जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे. ते सोलापूरमधील काँग्रेस शहरचे कार्याध्यक्ष होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर थेट भाजप कार्यालय गाठून भाजपात प्रवेश केला आहे. गेल्या आठ वर्षापासून उत्तर सोलापूर मतदारसंघात सक्रिय काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.
या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना सतीश बंदपट्टे यांनी सांगितलं की, मागील आठ वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये सक्रीयपणे काम केलं. सुशील कुमार शिंदे, प्रणितीताई शिंदे आणि शहराध्यक्ष चेतन नरुटे यांच्यासोबत मागील आठ वर्षांपासून अतिशय जोरात काम केलं. परंतु शहर उत्तरमध्ये ज्या ताकदीने काम करण्याची गरज होती. तसं काम होताना दिसत नव्हतं. त्यामुळे माझा मित्र परिवार, कार्यकर्ते आणि जनतेतून आवाज येऊ लागला की मी भाजपकडून निवडणूक लढवावी. त्यांच्या मागणीला मान देऊन मी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. भाजपकडून प्रभाग क्रमांक चार (ब) ओबीसी पुरुष गटातून मी उमेदवारी दाखल केली आहे.