मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून एकनाथ शिंदेंविरोधात त्याने केलेल्या एका गाण्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामराने स्टँड अप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं असून एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली आहे.
त्यामुळे कुणाल कामराविरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असून आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरीतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल केली आहे.
कुणाल कामराने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने एक गाणं म्हटल्याचं दिसून येतंय. या गाण्यात त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना गद्दार म्हटलं आहे.
घराणेशाही संपवण्यासाठी यांनी कुणाचातरी बाप चोरला असंही त्यामध्ये म्हटलं आहे. मंत्री नाही तर हे दलबदलू आहेत. मंत्रालयापेक्षा जास्त हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवरच जास्त असतात अशीही टीका त्यामध्ये करण्यात आली आहे.
कुणाल कामराचं हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे. कामराचा हा व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे.