मुंबई : शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या घराची अज्ञातांनी रेकी केल्याची बातमी काल समोर आली होती. हा घातपाताचा कट असल्याचा आरोप खुद्द राऊतांनीही केला. ज्यानंतर पोलीस आणि संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या. दरम्यान त्याच संर्दभात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
सरतेशेवटी राऊतांच्या घराची रेकी नेमकी कोणी केली होती यामागचं गुपितही उघड झालं. मिळलेल्या माहितीनुसार , रेकी करणारे 'ते' सेलप्लॅन, इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे चार कर्मचारी होते. ते ईरिक्सन कंपनीकडून Jio मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करत असल्याचं पोलीस चौकशी दरम्यान निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी तशी संबधीत कंपनीकडून खात्रीसुद्धा केली आहे.
शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल राऊत यांचे स्वीय सहाय्यक हितेश पटेल यांनी पोलिसांना फोनद्वारे आमदार सुनिल राऊत यांच्या मैत्री बंगल्यासमोर सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास दोन संशयीत इसम मोटार सायकलवर येऊन त्यांच्या घराची रेकी करुन निघून गेल्याचे कळवलं. त्यांच्या या सदर तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी सदर घटनेची सखोल चौकशी केली.
याबाबत मुंबई पोलिसांकडून प्रसिध्दी पत्रक जाहीर केलं आहे. खासदार संजय राऊत हे भांडुप येथील मैत्री बंगल्यात आमदार सुनील राऊत आणि संदीप राऊत यांच्यासह एकाच बंगल्यात राहतात. यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटांकडून त्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते त्यावर आता पडदा पडला आहे.