शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. राऊत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील भांडुप इथल्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांना दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टिज हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी केली होती.

सध्या संजय राऊत यांची प्रकृती स्थिर आहे. अस्वस्थ वाटत असल्याने तातडीने फोर्टिज रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.संजय राऊत यांना आज अचानक रुग्णालयात का दाखल केले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आता डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत काय माहिती देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे
सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, असं वक्तव्य केलं. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळत आहे.
यामध्ये संजय राऊतांनी मोठी भूमिका बजावली आहे. तसेच, गेल्या कित्येक दिवसांपासून संजय राऊत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत सातत्यानं वक्तव्य करत आहे. तसेच, शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूनं पक्षाची भूमिकाही प्रभावीपणे मांडत आहेत.