मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सायंकाळी पाच वाजता मातोश्री या निवासस्थानी भेट घेऊन हा पक्षप्रवेश केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात राज्यात आणखी एका काका विरुद्ध पुतण्याची राजकीय लढत पाहायला मिळू शकते, कारण साजन पाचपुते यांना ठाकरे गटात मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची देखील माहिती आहे.
साजन पाचपुते हे भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन पाचपुते विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत झाली आणि साजन यांनी बहुमताने विजय मिळवला आणि त्यावेळी पाचपुते कुटुंबात वादाची ठिणगी पडली.
मध्यंतरी साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवली आणि जिंकलीही होती. साजन पाचपुते यांच्याकडे काष्टी तालुक्यातील सरपंच आणि बाजार समितीचे संचालक ही पदं असतानाही राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते कुठल्याही पक्षात नव्हते.
मात्र, साजन पाचपुते आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मागील महिन्यात मुंबईत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची साजन पाचपुते यांनी भेट घेतली, त्यावेळी साजन हे ठाकरे गटाच्या पक्षात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाला होता.