मंत्रालयात नरहरी झिरवाळ यांच्याकडे असलेल्या अन्न व औषधी प्रशासन विभागात एक क्लार्कला लाच घेताना रंगेहात पकडलं. त्यामुळे राज्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. मंत्रालयात अन्न व औषधी प्रशासन विभागातील आलोसे राजेंद्र ढेरंगे या क्लार्कला मेडीकल परवाना निलंबन रद्द करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
दरम्यान 35 हजार रुपये लाच स्वीकारताना त्याला रंगेहात अटक केली. लाचलुचपत विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. ज्या विभागात लाच मागण्याचा प्रकार झाला, तो खातं मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे आहे. झिरवाळ सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एसीबीच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना झिरवाळ म्हणाले, “मी मागील दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. काल जी घटना घडली, ती अत्यंत चुकीची आहे आणि असे व्हायला नको होते. राजेंद्र ढेरंग हे लिपिक म्हणून कार्यरत होते. सुनावणीसंबंधी कागदपत्रे तयार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. ते मूळचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी असून, उसनवारीवर या विभागात नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी केलेल्या गैरप्रकाराला कुठेही पाठिशी घातले जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
“या प्रकाराचा पीएस, मंत्र्याचे ओसडी यांच्याशी काही संबंध नाही. माझी जबाबदारी आहे, नाही म्हणूनच चालणार नाही. त्याने जे प्रकार केलेत, त्याला पाठिशी घालणार नाही हे खात्रीने सांगतो. पूर्वीचे त्याचे काय गुण होते, हे सांगता येणार नाही” असं नरहरी झिरवाळ म्हणाले. “मुख्यमंत्री महोदयानी पीएस, ओसडी असा मंत्रालयीन स्टाफ खूप बारकाव्याने दिला आहे. ढेरंगेची तक्रार याआधी कधी आली नव्हती. त्याला जाब द्यावाचं लागेल. 50 हजार रुपये लाच हा प्रकार व्हायलाच नको.
विरोधकांकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी होतेय, यावर झिरवाळ म्हणाले की, “त्याची लिंक माझ्यापर्यंत आली, तर राजीनामा देणं माझी जबाबदारी राहिलं” “माझ्याशी लिंक जोडली गेली, तर मी राजीनामा देईन. ज्याने केलं, त्याला सजा भोगावी लागेल. माझ्यापर्यंत जबाबदारी आली, तर मी राजीनामा देईन. नैतिकता माझ्यामध्ये आहे” असं नरहरी झिरवाळ बोलले. “मला टार्गेट वैगेर कोणी करत नाहीय. माझा स्वाभाव सगळ्यांना माहित आहे. मी असं काही चुकीच करणार नाही” असं नरहरी झिरवाळ म्हणाले.