मुंबई : मंत्रालय आणि आजूबाजूच्या परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. मंत्रालय आणि आजूबाजूच्या इमारतीच्या तसेच वाहनांच्या काचा अचानक फुटल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , मेट्रो कामाच्या ब्लास्टमुळे मंत्रालयाच्या काचा फुटल्याची माहिती समोर आली आहे. ब्लास्टनंतर मंत्रालयात पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा देखील फुटल्या आहेत. मंत्रालयाच्या जवळ मेट्रोच्या सबवेचं काम सुरु आहे. या सबवेच्या कामासाठी अंतर्गत ब्लास्ट सुरू होते, त्यावेळी घटना घडल्याचं समोर आलं आहे.
ब्लास्ट करताच अनेक दगड मंत्रालयाच्या दिशेने उडाल्याने मंत्रालयातील पार्किंगला असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या. तसेच जवळ असलेल्या खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या पाहायला मिळत आहेत. सुदैवाने यात कुणीही जखमी नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मोठा अपघात टळला.
या ब्लास्टमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाचंही काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच इतर काही कार्यालयांच्या काचांचे देखील यामध्ये नुकसान झाले आहे.
मुंबई मेट्रोचं स्पष्टीकरण
मंत्रालय ते विधानभवन भुयारी मार्गाच्या एन्ट्री आणि एक्झिटचं खोदकाम सुरू असून या कामादरम्यान कठीण खडक फोडण्यासाठी नियंत्रित ब्लास्टिंग केले जात आहे. काही दिवसांपासून ब्लास्टिंगचे काम कोणत्याही अडचणीशिवाय सुरू आहे. मात्र आज या कामादरम्यान मंत्रालयाच्या काही खिडक्यांचे नुकसान झाले.
मेट्रोच्या प्रवक्त्यांनी याबाबत म्हटलं की, आम्ही खात्री देतो की मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आपले काम पूर्ण जबाबदारीने करत आहे. सध्या आम्ही मंत्रालयाजवळील भुयारी मार्गावर नियंत्रित ब्लास्टिंगचे काम थांबवत आहोत. या कामाचा आढावा घेतला जाईल. ब्लास्टिंगदरम्यान झालेल्या घटनेच्या कारणांचा अभ्यास करून सुधारणेनंतरच काम पुन्हा सुरू केले जाईल.