महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी भरभरून मतदान केले. शहरी भागापेक्षा निमशहरी आणि आदिवासी बहुल भागात अधिक मतदान झाले. त्या पाठोपाठ आलेल्या विविध संस्थांच्या Exit Poll ने महायुतीच्या पारड्यात मतांचा कौल टाकला. या एक्झिट पोलचा खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला.
लोकसभेला आम्हाला केवळ 10 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता. निकालानंतर काय झालं? असा सवाल त्यांनी केला. तर जर बहुमताचा आकडा महायुतीकडे आहे तर मग ते अपक्षांना लोणी का लावत आहेत, असा रोकडा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी महायुतीवर गंभीर आरोप केला आहे.
समाजवादी पक्षाला केवळ पाच जागा मिळतील असे भाकीत वर्तवले होते. त्यांनी 40 जागा जिंकल्या. मोदींना 400 जागा मिळणार, बहुमत सुद्धा मिळालं नाही. लोकसभेला आम्हाला दहा पण जागा मिळणार नाही, असा दावा करण्यात आला. आम्ही 31 जागा खेचून आणल्या. या सर्वेची ऐशी की तैशी असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकू असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीतील सर्व जण एकत्र बसलो. महाराष्ट्राचा अंदाज घेतला. अनिल देसाई, बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील यांच्यासह सर्व नेते मंडळी एकत्र आलो. प्रत्येक जागाचं गणित मांडलं. तेव्हा आम्ही 160 जागांवर सहज निवडून येऊ असं स्पष्ट झालं, असा दावा त्यांनी केला.
आम्ही जर 160 जागांवर जिंकत असू तर मग एक्झिट पोल कोणी केले. कुठल्या तरी कंपन्या येतात. काहीतरी एक्झिट पोल करतात. आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. आम्ही 26 नोव्हेंबरला सरकार बनवणार आहोत, असा दावा संजय राऊत यांनी केला. त्यांनी एक्झिट पोलचा अंदाज साफ नाकारला.