मुलाचा प्रेमविवाह आईच्या जीवावर बेतलाय. मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या पालकांनी जावयाच्या आईवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलंय. ही संतापजनक घटना कर्नाटकातील चिक्कबल्लापुर जिल्ह्यात घडली आहे.

नेमकं प्रकरण काय ?
चिक्कबल्लापुर जिल्ह्यातील पाटपाल्या पोलीस स्टेशन हद्दीतील संगतापल्ली गावातील रहिवासी अंबरीश आणि सिंगप्पागारीपल्ली गावातील रहिवासी प्रतिभा हे दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. प्रतिभाच्या घरच्या मंडळींनी या लग्नाला विरोध दर्शवला. कुटुंबियांनी केलेल्या विरोधाला झुगारून दोघांनी पळून जाऊन मंदिरात लग्न केलं.
प्रतिभाच्या कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या पळून जाण्याची बातमी कळताच त्यांचा राग शिगेला पोहोचला. मुलीचे कुटुंब अंबरिशच्या घरी गेले. मुलीच्या कुटुंबियांनी अंबरिशच्या घरी मोठा गोंधळ घातला. त्यांनी संतापाच्या भरात प्रतिभाचे पुस्तक, कपडे आणि इतर काही वस्तू जाळल्या. त्यावर पेट्रोल ओतून आग लावली. यादरम्यान, हे सर्व सुरू असताना अंबरिशची आई बयम्मा तेथून निघून गेली.
अंबरिशची आई निघून गेल्यानंतर प्रतिभाच्या कुटुंबाला राग अनावर झाला. प्रतिभाच्या आई वडिलांनी मिळून बयम्मावर पेट्रोल शिंपडले. तसेच आग लावली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी असलेल्या लोकांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या त्यांच्यावर बंगळूरूतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पाटपाल्या पोलीस स्टेशनमध्ये प्रतिभाच्या आई वडिलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी तक्रारीनुसार, पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. पीडित महिलेच्या कुटुंबियांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.