शिक्षणक्षेत्रातील विविध घोटाळ्याची अनेक प्रकरणे समोर येत आहे. मालेगाव शहरासह जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील घोटाळा संपूर्ण राज्यात गाजला. मालेगाव येथील मालेगाव हायस्कूल व महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्थेच्या या. ना. जाधव विद्यालयात अकरा बोगस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ उडाली.

मालेगाव शहरासह जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात गाजलेल्या या बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अखेर शिक्षण विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना शासनाने निलंबित केले. निलंबित अधिकऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील, उपशिक्षण अधिकारी उदय देवरे, तत्कालीन वेतन अधीक्षक सुधीर पगार यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या तिन्ही अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात अटक केली होती. ते ४८ तासांपेक्षा जास्त काळ पोलिस कोठडीत राहिल्याने त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. पुढील आदेश येईपर्यंत हे अधिकारी निलंबित राहणार आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
मालेगाव येथील मालेगाव हायस्कूल व महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्थेच्या या. ना. जाधव विद्यालयात अकरा बोगस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. या घोटाळ्याप्रकरणी पवारवाडी व छावणी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पथकाकडून तपास सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण पाटील, सुधीर पगार व उदय देवरे यांना यापूर्वीच अटक केली होती.
त्यांना पोलिस कोठडी व न्यायालयीन कोठडीदेखील सुनावण्यात आली होती. आता शासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत घेतलेल्या भरती प्रक्रियेत अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे झाल्याचा आरोप आहे.