मालेगाव : महिलेसोबतची ओळख व्यावसायिकाला पडली महागात, महिलेचा खरा चेहरा समोर आल्यावर त्यालाही बसला हादरा
मालेगाव : महिलेसोबतची ओळख व्यावसायिकाला पडली महागात, महिलेचा खरा चेहरा समोर आल्यावर त्यालाही बसला हादरा
img
वैष्णवी सांगळे
सोशल मीडिया जितका चांगला तितकाच वाईट. सोशल मीडियामुळे अनोळखी लोकांशी मैत्री करणे अगदी क्षुल्लक मानले जाते पण याच प्रकाराने अनेकांना आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. काहींची सोशल मोडियावरच तर काहींची प्रत्यक्ष भेट घेत फसवणूक झाली आहे. मालेगावातील एका तरुण व्यावसायिकालाही सोशल मीडियावर अनोळखी महिलेशी केलेली ओळख चांगलीच महागात पडलीय. 



नेमके प्रकरण काय ? 
इंस्टाग्रामवर मुंबईच्या दहिसर भागातील महिलेशी मालेगावातील तरुण व्यावसायिकाची ओळख झाली. ही ओळख काही दिवसातच सलगीत परावर्तित झाली. 
या प्रकरणातील तक्रारदार हा व्यावसायिक आहे. त्याची मालेगावात मोबाईल शॉपी आहे. तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या दहिसर भागातील महिलेने इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधून त्याच्याशी जवळीक निर्माण केली. विश्वास संपादन करून त्याला तिने वेळोवेळी मुंबईला बोलावून घेतले. 



दरम्यानच्या काळात तिचे डान्स बारमध्ये काम करणे,दारू पिणे व देहविक्री करणे यासंबंधी माहिती तक्रारदाराला कळाली. वस्तुस्थिती समजल्यावर त्याने तिच्याशी दुरावा निर्माण केला. तेव्हा बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत संबंधित महिलेकडून व्यावसायिकाला ब्लॅकमेल करणे सुरू झाले.
खोट्या गुन्ह्याची भीती निर्माण झाल्याने सुरुवातीला महिलेच्या मागण्या पूर्ण करणे व्यावसायिकाला भाग पडले.

त्यानुसार अडीच लाखाची रक्कम,एक लाख १० हजाराची दुचाकी,९५ हजार रुपये किंमतीचा आयफोन असा चार लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ऐवज तिने त्याच्याकडून उकळला. एवढे झाल्यावर देखील या महिलेच्या मागण्या सुरूच राहिल्या. गेल्या २७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही महिला व्यावसायिकाच्या दुकानात जाऊन धडकली. तेथे ९८ हजार रुपये किंमत असलेल्या आयफोन १६ प्रो मॅक्स मोबाईलची मागणी तिने केली. हा मोबाईल देण्यास नकार दिल्यावर व्यावसायिक तसेच त्याच्या भावाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा दम तिने भरला.

 गेल्या तीन वर्षात रोख रक्कम आणि वस्तू असा जवळपास साडेपाच लाख रुपयांचा ऐवज तिने त्याच्याकडून उकळला.त्यानंतरही तिचा हा हव्यास काही संपता संपत नव्हता. सातत्याने होणाऱ्या या प्रकाराला कंटाळलेल्या आणि या महिलेच्या जाचातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी या व्यावसायिकाला अखेर पोलिसात धाव घ्यावी लागली.

यानंतर व्यावसायिकाने शहर पोलीस ठाण्यात जाऊन या महिलेविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group