मालेगाव तालुका पोलिसांनी नकली नोटा चलनात आणण्याचा डाव उधळला आहे. या प्रकरणात दोन परप्रांतीयांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याय. यातील एक जण मौलाना असून तो ही या गोरख धंद्यात सहभागी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे
नकली नोटा विक्री करून त्या चलनात आणण्याच्या उद्देशाने काही व्यक्ती राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने संबंधित हॉटेल परिसरात होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. 
या दरम्यान दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली. यावेळी त्यांच्या बॅगेत ठेवलेल्या पाचशे रुपयांच्या दोन हजार नोटा आढळून आल्या. प्रथमदर्शनी हुबेहूब वाटणाऱ्या या नोटांचे पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केले. या नोटांची छपाई, कागदाचा दर्जा व सुरक्षा धागा तपासल्यावर त्या नकली असल्याची खात्री पोलिसांची पटली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे
त्यांच्या ताब्यातील बनावट नोटा, दोन मोबाईल संच व बॅग असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना लागलीच अटक करण्यात आली. न्यायालयात उभे केले असता दोघांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.