नाशिक (प्रतिनिधी) :- अर्धवट माहितीच्या आधारे कोणताही अभ्यास न करता आपले मत व्यक्त करीत केवळ चर्चेत राहण्यासाठी खासदार संजय राऊत हे अतिशय खालच्या स्तरावर जाऊन आपले संभाषण करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केला आहे.
वसंत स्मृती या भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत जे स्वतःला विश्व प्रवक्ते समजतात. हे रोज काही ना काही शोधून पूर्ण माहितीचा आधार न बोलता मनाला येईल ते आरोप करीत बडबडत असतात.
त्यामुळे त्यांचा स्तर अधिकच घसरत असून आता त्यांची कीव करावीशी वाटते, मात्र प्रसार माध्यमांनी त्यांना किती महत्व द्यायचे याबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले.
राऊत हे नेहमीच चुकीचे मुद्दे उपस्थित करून बदनामी करत असतात. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणे आता महत्त्वाचे ठरत आहे. ते बेछूटपणे करीत असलेले सर्वच आरोप धादांत खोटे असून त्यातला एकतरी मुद्दा त्यांनी सिद्ध करून दाखवावा असे आव्हान चव्हाण यांनी दिले.
यावेळी भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजपा कामगार मोर्चाचे शहराध्यक्ष हेमंत नेहेते, गोविंद बोरसे, नाना शिलेदार, सुजाता करजगीकर आदी उपस्थित होते.