नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला
नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला
img
दैनिक भ्रमर

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला असून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार आहे. तर रायगडचा तिढा मात्र कायम असल्याची माहिती भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्याने दिली. 

नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडेच देण्यात आले असून आता रायगडचा तिढा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून सोडवावा असे दिल्लीतून सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. 18 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली होती. या स्थगितीमुळे शिंदे गटाचे नेते नाराज असल्याचे बोलले जात होते. दरम्यान काल भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी पालकमंत्री पदाचा तिढा दोन दिवसांत सुटेल असे सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने तसा स्पष्ट संदेश दिला असून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन होणार आहेत.

नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुटला असून रायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच मात्र कायम आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार असून ते अन्य कोणाला दिले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिला आहे. 

रायगड बाबत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी एकत्र बसून हा पेच सोडवण्याचे संदेश भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर  रायगड मध्ये भरत गोगावले आणि नाशिक मध्ये दादा भुसे नाराज असल्याचे बोलले जात होते. आता हा पेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी एकत्र सोडवावा असे आदेश देण्यात आले आहेत.

इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group