राज्याच्या राजकारणातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर सुरु असल्याची चर्चा आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि ठाकरे गटाचे मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.
मात्र एकीकडे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच आता दोन्ही शिवसेना जोडण्यासंदर्भात मंत्री संजय शिरसाट यांनी एका वृत्त संस्थेशी बोलताना मोठं विधान केलं आहे. संजय शिरसाट यांच्या या भूमिकेवर ठाकरे गटाकडून कोणती प्रतिक्रिया दिली जाणार , याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधलं अंतर वाढलं नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील, असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय. दोन शिवसेना झाल्या याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मोठं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय. दरम्यान या दोघांचे तार जोडले पाहिजेत. मात्र प्रयत्न एका बाजूने करून चालणार नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले.
राज्यात गेल्या दोन मोठ्या निवडणुकांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचं दिसून आलं. अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं, वेगवेगळ्या पक्षांमधून निवडणूक लढले, काहींना यश आलं तर काहींना अपयश आलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आमि महानगरपालिका निवडणुकांची रणनिती सर्वच पक्षांकडून आखली जात आहे. त्या दृष्टीने राजकीय पक्ष कामाला लागले आहे.
अशातच आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीला महायुतीतील पक्ष धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच महायुतीमध्ये सुरू झाल्या असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत.