शिवसेना शिंदे गटाचे नेते पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. वारंवार आपल्या वक्तव्यामुळे किंवा कोणत्या ना कोणत्या कृतीमुळे चर्चेत येणारे बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा राड्यामुळे चर्चेत आले आहेत. शीळ व निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा घातल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी आमदार निवासमधील कॅन्टीन व्यवस्थापकाला देखील सुनावलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डर प्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं वरण आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला. त्यानंतर गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं.
आकाशवाणी आमदार वसतिगृहात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण केल्याचंही यावेळी दिसून आलं. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवले होते, पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आला. डाळाची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला याबाबत विचारणा केली, त्याचबरोबर यावेळी त्यांनी कोणीही बील देऊ नका असंही सांगितलं, त्याचबरोबर बील काऊंंटरवरती बसलेल्या ऑपरेटरच्या कानशिलात देखील लगावली. या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावरती व्हायरल झाले आहेत.