मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने देशात १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही.
त्यामुळे, महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपानंतरच भाजपाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल, असे दिसून येते. गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुंबईत शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत जागावाटपावर चर्चा करत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीला नेमक्या कोणत्या जागा देण्यात येणार आहेत, यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत अमित शाह यांची मुंबईत चर्चा सुरु आहे. अशात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जेवढ्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला असणार तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला हव्यात, असे भुजबळ म्हणाले आहेत.
अमित शाह यांची जागावाटपाबाबत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा सुरू आहे. यावर बोलतांना भुजबळ म्हणाले की, "दोन दिवस आमच्या बैठक घेण्यात आल्या. मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते. तसेच, जितक्या जागा शिंदे यांना दिल्या जातील, तितक्याच जागा आम्हाला हव्या आहेत. आमचे वरिष्ठ यावर प्रयत्न करत असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत.
'या' जागांवर राष्ट्रवादीचा दावा...
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामती, रायगड, शिरूर, सातारा, परभणी, गडचिरोली, धारशिव, दिंडोरी किंवा नाशिक, बुलढाणा या जागांवर अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत दावा सांगणार आहे. त्यामुळे या बैठकीत अंतिम कोणता निर्णय होणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.