मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आज २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक मोठ्या नेत्यांची नावे आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा, अंधेरी पूर्वमधून मूरजी पटेल, रिसोडमधून भावना गवळी, पुरंदरमधून विजय शिवतारे, कुडाळमधून निलेश राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिंदे गटाच्या दुसऱ्या यादीनुसार, अक्कलकुआमधून आमश्या पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बाळापूरमधून बळीराम शिरसकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांचा सामना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्याविरोधात असणार आहे. रिसोडमध्ये भावना गवळी यांना संधी देण्यात आली आहे. भावना गवळी यांना काही दिवसांपूर्वी विधान परिषदेची संधी देण्यात आली होती.
यामध्ये त्या जिंकून आल्या होत्या. पण लोकसभेला त्यांना संधी न मिळाल्याने त्या नाराज असल्याची माहिती होती. विधान परिषदेची संधी देवून एकनाथ शिंदे यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर भावना गवळी यांना रिसोडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.