महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रातील निवडणूक ही प्रामुख्याने दोन आघाड्यांमध्ये आहे. एका बाजूला सत्तेत असलेली महायुती आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. यातच राज्यातील हाय होल्टेज लढत अशी बारामतीमध्ये होत आहे. या लढतीत पवार काका-पुतण्या आमनेसामने आहेत.
दरम्यान मतदान सुरू होताच अजित पवार आणि युगेंद्र पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी दोघांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच जिंकण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, मला १००% विश्वास आहे की बारामतीची जनता शरद पवारांना विसरणार नाही आणि आम्हाला आशीर्वाद देईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
युगेंद्र पवार जिंकण्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मोठी मेहनत घेतली आहे. जोरदार प्रचार आणि सभांचे आयोजन हे मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. तसेच अजित पवारांनीही निवडणूक जिंकण्यासाठी सर्व ताकद लावली आहे.
अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की, महायुती सरकार स्थापन करणार आहे. लोकसभेच्या वेळीही आमच्या कुटुंबातील सदस्य एकमेकांविरुद्ध लढत होते आणि ते सर्वांनी पाहिले आहे. मी बारामतीत सर्वांना भेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी बारामतीची जनता मला विजयी करेल अशी आशा आहे. बारामतीची जनता याचा विचार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले की, आम्ही काम केले आहे. यापुढेही आम्हाला काम करायचे आहे आणि भविष्यातील घडामोडींचे व्हिजन आमच्याकडे आहे. बारामतीच्या मतदारांवर माझा विश्वास आहे की ते मला विजयी करतील. आणि मला आठव्यांदा विधानसभेत पाठवतील . आता या लढतीत कौल कुणाच्या बाजूने लागतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.