राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जवळपास शांत झाली आहे. यंदा तीस वर्षांत पहिल्यांदा ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालंय. त्यांचा निकाल उद्या (२३ नोव्हेंबर) सकाळी आठ वाजल्यापासून जाहीर होईल. दरम्यान कुणाची सत्ता स्थापन होऊ शकते, याबबाबतचे अंदाजही वर्तवण्यात येत आहेत अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. यावेळी अमोल मिटकरी यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. “जर अजित पवार बारामती पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा-मुंब्रात काम करेन. पण जर निवडून आले तर जितेंद्र आव्हाड यांनी रोज सकाळी 8 वाजता वर्षा बंगल्यावर पाणी भरायला यायचं.
दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होतील कारण आमच्या 35 जागा निवडून येतील. स्ट्राईक रेटवर आम्ही मुख्यमंत्री पद घेऊ”, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
“जितेंद्र आव्हाड जर उद्या हरले आणि नजीब मुल्ला जिंकले तर मी कळवा-मुंब्रामध्ये जाऊन त्यांच्या घरासमोर झिंगाट डान्स करणार आहे”, असं मिश्किल वक्तव्य देखील अमोल मिटकरी यांनी केलं.
अजित पवार किंगमेकर ठरतील
शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना जसं वाटतं की मुख्यमंत्री त्यांचा होईल तसंच आमचं देखील म्हणणं आहे की अजित पवार मुख्यमंत्री होतील. शेवटी अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी मांडली. अजित पवार किंगमेकर ठरतील. उद्या दुपारी १ पर्यंत सांगतो. आम्हाला आता देवगिरी बंगला सोडायचा आहे आणि वर्षा बंगला गाठायचा आहे, असं देखील अमोल मिटकरी म्हणाले.