मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
या भेटीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची भाजपसोबत महायुती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी जोरदार चर्चा रंगली असताना उद्धव ठाकरेंनी या भेटीवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांना आता असे कळले आहे की, महाराष्ट्रात मत पाहिजे असतील तर मोदी या नावाने मत मिळणार नाही.
ठाकरेंच्या नावाने महाराष्ट्रात मत मिळतात. म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो चोरला. काही फरक पडत नाही. आता आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. घेऊन जा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करत आहे की, नुसते जल्लोषात राहू नका, आपण 100 टक्के जिंकणारच आहोत. पण जिंकण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय जिंकता येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.