नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटता सुटत नाहीये. खा. श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांचे नाव चर्चेत आले. दुसरीकडे नाशिकच्या जागेसाठी भाजपही आग्रही आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी छगन भुजबळांना मिळणार असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. नाशिकची जागा आपल्याला मिळावी यासाठी विद्यमान हेमंत गोडसे यांनी मुंबईत गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यातच ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी खळबळजनक दावा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
सिन्नर मधील ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'हेमंत गोडसेंची ३ माणसे माझ्याकडे येऊन गेली. आम्हाला पदरात घ्या म्हटले पण मी त्यांना सांगितलं गद्दारांना माफी नाही, आता वेळ निघून गेली तुम्ही तुमच्या पक्षात परत जा आणि समोरून लढा, असे सुधाकर बडगुजर म्हणाले. बडगुजरांच्या या वक्तव्यावर हेमंत गोडसे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.