आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाबाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष एकजूट असल्याचं दाखवत असले तरी महायुतीत असलेली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसून येत आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी बाबतीत राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणालेत तानाजी सावंत?
आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये पटलेले नाही. राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे, असं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्याचं व्हायरल व्हिडिओतून समोर आलं आहे.
तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये ते म्हणतात, अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असंही सावंत म्हणालेत.