विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.
विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच सध्या शिवसेना शिंदे गटात हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत ऐनवेळी ज्येष्ठ नेत्यांना डावलून सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानपरिषद निवडणुकीतही धक्कातंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपत आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना विधानपरिषदेसाठी पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र, विधानपरिषदेच्या दुसऱ्या जागेसाठी पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या कोट्यातली दुसऱ्या जागेवरुन उमेदवारी मिळावी, यासाठी रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दिपक सावंत आणि इतर अनेक नेते इच्छूक आहेत.
विधानसभेतील संख्याबळ हे 57 असून विधान परिषदेची दुसरी जागा निवडून येण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र, राज्यसभेप्रमाणे शिंदे आता विधान परिषदेच्या दुसऱ्या जागेसाठी पक्षातील अनुभवी नेत्यांची निवड करतात की, ज्योती वाघमारे प्रमाणे सामान्य शिवसैनिकाला संधी देतात का, हे पाहणं महत्वाचे आहे.