नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे यांनी जे वातावरण निर्माण केले आहे, ते शांत करण्यासाठीच अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर केला गेल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला आहे. आगामी निवडणुकीत राज्यातील जनताच एकनाथ शिंदे यांचा एन्काऊंटर करणार आहे, असाही टोला त्यांनी लगावला.
खा. संजय राऊत सोमवारी मनमाड येथे कार्यक्रमासाठी जात असताना नाशिकमध्ये काही काळ थांबले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, उपनेते सुनील बागूल, दत्ता गायकवाड, विनायक पांडे व अन्य पदाधिकार्यांनी केले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, की अक्षय शिंदे हा बदलापूर प्रकरणातील आरोपी हा सफाई कामगार असून, त्याला रिव्हॉल्व्हर चालविण्याचे प्रशिक्षण कोणी दिले? रिव्हॉल्व्हर ही लॉक असताना तिचे लॉक ओपन कसे झाले? यासारखे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत.
जनतेला हे ही माहिती आहे, की झालेले एन्काऊंटर हे पूर्णपणे मॅनेज केलेले आहे. त्यामुळे त्यावर सरकारने खुलासा देऊ नये; पण सरकार अक्षय शिंदेच्या या माध्यमातून कोणाला वाचवत आहे? संस्थाचालकांवर गुन्हे दाखल होऊनसुद्धा त्यांना अटक का झाली नाही? असे प्रश्न उपस्थित करून राऊत पुढे म्हणाले, की जे आंदोलन झाले, त्या आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे हे सरकारने मागे घेतले पाहिजेत. ज्या सरकारने एन्काऊंटर केले आहे, त्या सरकारने आंदोलनकर्त्यांची मागणीच पूर्ण केली आहे, मग आंदोलकांवर गुन्हे का दाखल करावेत, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.
खा. संजय राऊत बोलताना पुढे म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जे खटले चालू आहेत, ते सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर चालू आहेत. आरोपीच सरन्यायाधीशांबरोबर बसून चहापाणी आणि मस्करी करणार असेल, तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.
लक्ष विचलित करण्यासाठीच एन्काऊंटर
राज्यामध्ये सध्या सरकारची खुर्ची धोक्यात आहेत, त्याचे कारण म्हणजे मराठा आरक्षण मुद्यावरून जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण सरकारच्या खुर्चीला त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे त्यावरील लक्ष हटविण्यासाठी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर केला. राज्यातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार असल्याचा आरोपदेखील खा. राऊत यांनी केला.