बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत . या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी प्रमुख आरती सिंह बुधवारी बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्या दिवशी पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकरणाची चौकशीसुद्धा त्या करत आहेत. दरम्यान, पोलिसांना या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेविरोधात महत्त्वाचा तांत्रिक पुरावा सापडला आहे. शाळेच्या गेटच्या बाहेरच्या सीसीटीव्हीत अक्षय शिंदे शाळेत जाताना आणि येताना दिसून येत असल्याचा पुरावा सापडला.
घटनेच्या महिन्याभर आधीपासून शाळेतील सर्व सीसीटीव्ही बंद होते. सीसीटीव्ही बंद असल्याने तांत्रिक पुरावे जमा करण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. शाळेतील सर्व सीसीटीव्ही बंद असल्याने घटनेच्या वेळी शाळेत असल्याचा पुरावा अद्याप हाती आला नव्हता. त्यामुळे एसआयटीकडून अनेक दिवस शोधमोहीम राबवल्यानंतर सीसीटीव्हीचा महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. एका दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटनेच्या दिवशी अक्षय शिंदे शाळेच्या आत जाताना आणि बाहेर पडताना दिसून येत आहे.