बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा एन्काऊंटर करण्यात आला होता.
सध्या अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. काल गुरुवारी (दि. 06) झालेल्या सुनावणीवेळी अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी आम्हाला केस लढवायचे नाही, अशी खळबळजनक भूमिका घेतली होती. यावर आज शुक्रवारी (दि. 07) मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून सुनावणी सुरूच राहणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट होता आणि त्या प्रकरणात दोषी असणाऱ्या पाच पोलिसांवर काय कारवाई केली? या प्रकरणावर गुरुवारी दिवसभर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
मात्र, गुरुवारी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाकडे हात जोडून विनंती केली होती. अक्षय शिंदेचे बनावट एन्काऊंटरचे प्रकरण आता यापुढे आम्हाला न्यायालयात लढवायचे नाही, असे त्यांनी कोर्टाला सांगितले होते.
अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी आम्हाला ही धावपळ आम्हाला जमत नाही. आमच्या सुनेला नुकतेच मूल जन्माला आलेले आहे. आम्हाला आता त्याच्याकडे जायचे आहे. त्यामुळे ही दररोजची धावपळ आणि प्रवास आम्हाला जमत नाही. असे कोर्टाला सांगितले होते.
आता यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अक्षय शिंदेच्या आई वडिलांना कोर्टात हजर राहण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तुम्हाला यायचं असेल तर या. नाहीतर यायची गरज नाही. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, मात्र सुनावणी सुरूच राहणार आहे.
आम्ही तुम्हाला बोलावलं नव्हतं, असे म्हणत न्यायालयाने अक्षय शिंदेच्या आई वडिलांना समजावलं आहे. त्यामुळे आता अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी सुरूच राहणार आहे. 24 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.