बदलापूरच्या शाळेत मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. दरम्यान , तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना पोलिसांच्या जीपमध्ये असताना अक्षयने पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून घेतली आणि पोलिसांवरच तीन गोळ्या फायर केल्या, यातली एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली. यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलीस निरिक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडली, यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला. दरम्यान , अक्षय शिंदेचा मृतदेह दहन न करता पुरला जाणार आहे .
याविषयी अधिक माहिती अशी की, दफन करण्याची इच्छा त्याच्या कुटुंबाने व्यक्त केली आहे. अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरला जाणार आहे, असं अमित कटारनवरे यांनी सांगितलं आहे.
भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल परंतू मृतदेह पुरण्यासाठीही जागा मिळत नाहीये. अक्षय शिंदेला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यामुळे कुटुंबाची भावना आहे की अक्षयचा मृतदेह शक्य तितका जतन करून ठेवला जावा, अशी प्रतिक्रिया अमित कटारनवरे यांनी दिली आहे.
दरम्यान , अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी पोलिसांनी जागा उपलब्ध करून द्यावी आणि यासंदर्भात महानगरपालिकेशी बोलावं असं सांगितलं आहे. आज कोर्टात सरकारी वकिलांकडून महानगरपालिकेशी बोलून दफनविधीसाठी जागा दिली जाईल, असं आश्वासन देण्यात आल्याचं अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे म्हणाले आहेत.