बदलापूर अत्याचार प्रकरण ; आंदोलनानंतर तब्बल १० तासांनी पहिली ट्रेन रवाना
बदलापूर अत्याचार प्रकरण ; आंदोलनानंतर तब्बल १० तासांनी पहिली ट्रेन रवाना
img
दैनिक भ्रमर
बदलापूर : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील, नामांकित अशा आदर्श स्कूलमध्ये तीन आणि चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सफाई कर्मचाऱ्याने मुलींच्या स्वच्छतागृहात हे कृत्य केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मुलींच्या संतप्त पालकांसह हजारो लोकांनी सकाळपासून लोकल रेल्वे स्थानकावर ठिय्या आंदोलन करून लोकल ट्रेन सेवा विस्कळीत केली होती. त्यानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. आंदोलनामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळी १०.१० वाजता रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. 

सकाळपासून जवळपास ८ तास आंदोलन सुरू होतं. या काळात बदलापुरवरुन सीएसएमटीकडे तसंच बदलापुरहून कर्जतकडे एकही ट्रेन गेली नव्हती. आता तब्बल १० तासांनी कर्जनवरुन निघालेली पहिली लोकल सीएसटीकडे रवाना झाली आहे. मात्र सध्या सीएसएमटी ते अंबरनाथपर्यंत लोकल सुरू असून अंबरनाथ ते कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प आहे. संध्याकाळी गर्दीच्या वेळी कल्याण ते अंबरनाथवरून प्रवाशांसाठी राज्य परिवहन आणि केडीएमसीकडे एकूण १०० बस गाड्यांची मागणी केली आहे. मेल-एक्स्प्रेस सरासरी एक तास उशीराने धावत होत्या.

दरम्यान , छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन अंबरनाथ-कसारापर्यंत रेल्वे वाहतूक सुरू होती. मात्र अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान आंदोलकांमुळे रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. रेल्वे स्थानकात झालेल्या आंदोलनामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत १२ मेल-एक्स्प्रेस आणि ३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. १३ मेल-एक्स्प्रेस बदलापूर-कल्याण ऐवजी दिवा-पनवेल-कर्जतमार्गे चालवण्यात आल्या होत्या, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळी आंदोलकांनी रुळावर येत घोषणा देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांना वारंवार रुळांवरून हटवण्याचं आवाहन केलं. मात्र आंदोलक ठाम असल्याने त्यांनी रेलरोको करत ट्रॅकवर आंदोलन सुरूच ठेवलं. अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना रुळांवरून दूर केलं. बदलापूर स्थानकात झालेल्या दगडफेकीत ४ रेल्वे पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group