बदलापूर मध्ये शाळेत दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याविरूद्ध स्थानिक बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलनासाठी जमले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले
दरम्यान , संतापजनक घडलेल्या घटने वरून संतप्त नागरिकांनी 8 तास बदलापूर स्टेशनवर रेल रोको आंदोलन केलं. यानंतर आता पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवलं आहे आणि रेल्वे स्टेशन खाली केलं आहे. दुसरीकडे जमावाकडून पोलिसांवर दगडफेकीची घटनाही घडली आहे.
आज सकाळपासून बदलापूर स्टेशनवर नागरिकांनी आंदोलन सुरू केलं होतं, त्यामुळे एकही ट्रेन बदलापूरहून निघाली नाही अथवा बदलापूरमध्ये आली नाही. मंत्री गिरीश महाजन यांनीही बदलापूर स्टेशनवर जाऊन आंदोलकांना त्यांचं आंदोलन मागे घ्यायचं आवाहन केलं, पण यानंतरही आंदोलक नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीवर ठाम राहिले. अखेर गिरीश महाजन यांना बदलापूर स्टेशनहून निघावं लागलं.
या प्रकरणा विषयी माहिती अशी की , बदलापूरच्या नामांकित शाळेत सफाई कर्मचारी असलेल्या आरोपी अक्षय शिंदे याने 12 तारखेला एका मुलीचा विनयभंग केला, त्यानंतर त्याने 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याचा आणि शाळेने तक्रार देऊनही कारवाई न केल्यामुळे जमाव संतप्त झाला आणि त्यांनी बदलापूर बंदची हाक दिली. यानंतर आंदोलकांनी त्यांचा मोर्चा बदलापूर स्टेशनवर वळवला आणि रेल रोको आंदोलन केलं.