पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर तिच्याच रुग्णालयात अत्याचार करुन अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या घटनेची दाहकता अद्याप शमलेली नाही. तोच आता बदलापुरात दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची चिड आणणारी घटना घडली आहे.
बदलापूर शहरातील एक शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी बदलापूर शहरात संतप्त प्रतीक्रिया उमटत आहेत. ज्या शाळेत हीघटना घडली होती त्या शाळेच्या बाहेर आज सकाळपासूनच संतप्त पालक तसेच बदलापूरकर जमले आहेत. सकाळपासून शाळेच्या गेटवर पालकांनी व बदलापूरकरांनी ठिय्या आंदोलन केले आहे. बदलापूर पोलिसांचा शाळेच्या गेटवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बदलापुरात एका नामांकित शाळेत चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचार केले होते, याप्रकरणी शाळा प्रशासनाने कोणतेही गांभीर्य न दाखवल्याने शाळा प्रशासनाच्या विरोधात बदलापूरकर आक्रमक झाले आहेत. आज सकाळ पासूनच पालकांसह बदलापूरकर नागरिकांनी शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
'शाळेने मुलींच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी, आमच्या मुली इथे सुरक्षित नाहीत' अशा पालक आणि बदलापूरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बदलापूर पोलिसांचा शाळेच्या गेटवर मोठा बंदोबस्त आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी १२ तास लावले होते. त्यामुळे नागरिकांच्या आंदोलनानंतर इथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षक, मुलांना ने आण करणाऱ्या सेविका यांना निलंबित करण्यात आलं असून कंत्राटी पद्धतीने सुरू असलेला सफाई कामगारांचा ठेकाही रद्द करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. सफाई कर्मचाऱ्यानेच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर मुलींच्या पालकांनी याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास 12 तास लावले. असा आरोप पालकांनी केला होता. आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी शाळेने माफीनामादेखील दिला आहे.
ज्या शाळेत हा प्रकार घडला आहे त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षका, मुलांची ने आण करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात बदलापूरकरांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.