बदलापुर येथे शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी घटनेवर संताप व्यक्त केला आहे. आपल्या आई-बहिणींवर हात टाकणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. तसेच, बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपी फाशीची शिक्षा द्या, अशी मागणीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय. यवतमाळ मधील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातील जाहीर सभेत त्यांनी आपला संताप व्यक्त केला .
काय म्हणाले अजित पवार
'जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे, तो कितीही मोठ्या बापाचा असूद्या किंवा कितीही मोठ्या वशिल्याचा असू द्या, त्याची फिकिर आम्ही करणार नाही. त्याला इतकं कडक शासन करणार, आमचा तर प्रयत्न सुरु आहे शक्ती कायदा दिल्लीत राष्ट्रपतींकडे गेला आहे, तो लवकर मंजूर करुन आणायचा आहे. माझ्या तर मनात वैयक्तिक आहे, अशा प्रकारची विकृत माणसं, ज्यावेळेस आमच्या आई-बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात, त्यावेळेस त्यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे, की पुन्हा तसा विचारही त्यांच्या मनात येता कामा नये'
'माझ्या भाषेत सांगायचं तर त्यांचं सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच. हे केलंच पाहिजे इतके नालायक काही काही लोकं आहेत, जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे' असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.