आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर अली आहे. बदलापूरमध्ये अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी घटना समोर आल्यानंतर या घटनेनं संपूर्ण बदलापूर हादरलं असून, शाळाबाहेर सर्व पालकांनी मोठी गर्दी केलीये. बदलापूरकरांनी बंदची हाक दिलीये. सर्व पालक हे मोठ्या प्रमाणात शाळेबाहेर जमले असून, सफाई कर्मचाऱ्याने हे कृत्य केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान या कृत्याबाबत त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ही पालकांकडून होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
बदलापूर मधील नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार 12 ऑगस्ट रोजी झाला होता. या प्रकरणातील आरोपी शाळेत 1 ऑगस्ट रोजी कामावर कंत्राटी पद्धतीनं रुजू झाला होता. आरोपी अक्षय शिंदे यानं लहान मुलींचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनानं माफीनामा सादर केला असून मुख्याध्यापकांसह चार जणांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.
या घटनेनंतर पालकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये दिरंगाई झाल्याचं समोर आलं. पीडित मुलीच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला 12 तास वाट पाहायला लागली. यानंतर आज बदलापूरमध्ये नागरिक आक्रमक झाल्याचं समोर आलं आहे.