"त्या" संतापजनक प्रकरणानंतर , मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय म्हणाले वाचा....
img
Dipali Ghadwaje
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर आता पालक आणि बदलापूरमधील अनेक नागरिक संतप्त झाले असून ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

बदलापूरमधील या संतापजनक घटनेवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मी पोलीस आयुक्तांशी स्वत: बोललो, त्या आरोपीला अटक झाली आहे, जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल, पोक्सो अंतर्गत कलमं लावायला सांगितलं आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल. या खटल्यास विशेष पीपी नेमण्यास सांगितलं आहे. संस्था चालकांचीही चौकशी करुन जे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करु. पोलिसांनी आरोपींना अरेस्ट केलं आहे, पोलिसांना अटेम्पट टू रेप हा खटला दाखल करायला सांगितलं आहे. संस्थाचलकांनीही कर्मचारी ठेवताना बॅकग्राऊंड तपासलं पाहिजे, जर तसं झालं नसेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल. अत्यंत कठोर कारवाई करु, पोलीस, गृह विभाग आणि सरकार पूर्ण कठोर कारवाई करण्याच्या बाजूने असतील. कोणी पोलीस असतील, जे यात दोषी आढळले तर त्यांनाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group