बदलापूर येथील नामांकीत शाळेत घडलेल्या घटनेनतंर जनसामान्यांमध्ये संतापाची भावना आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात स्वच्छता कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केला. काल बदलापूर येथे या घटनेविरोधात मोठं जन आंदोलन झालं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे आंदोलन सुरु होतं. त्या शाळेच्या परिसरात मोठा जमाव जमला होता. रेल्वे स्टेशनवर लोक आंदोलनाला बसले होते. अखेर रेल्वे रुळावरुन आंदोलक हटत नसल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. बदलापूरमधील या जनआक्रोश आंदोलनाने सरकारला हलवून सोडलय. आजही या घटनेचे पडसाद उमटताना दिसतायत.
सरकार डॅमेज कंट्रोलच्या मोडमध्ये आहे. बदलापूरच्या शाळेत घडलेल्या घटनेपासून धडा घेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे.
बदलापूरच्या शाळेत जे घडलं, तसं पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने हे पाऊल उचललय. सरकार डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नात आहे.
मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काय घोषणा केली आहे?
- मुंबईतील प्रत्येक शिक्षण संस्थेत महिला स्वच्छतागृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
- प्रत्येक शाळेत आत्मरक्षाशी निगडीत अभियानाची सुरुवात केली जाणार आहे.
- शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पोलीस वेरिफिकेशन करण्याचे आदेश.
- कर्मचाऱ्यांमध्ये बस चालक, वाहक, सुरक्षा कर्मचारी, कॅन्टीनमधील कर्मचारी या सगळ्यांचा समावेश.
- शाळेत महिला पालकांची आणि शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करणार.
- प्रत्येक महिन्याला मुलींच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा घेतला जाणार आढावा.