बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकांवर आंदोलकांनी रुद्रावरतार धारण केलाय. आंदोलकांकडून आरोपींना 'फाशी द्या'च्या घोषणा सुरुच आहेत.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, आंदोलकांकडून त्यांच्यावर बाटली फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अजूनही बदलापूरमधील जमाव पांगवण्यात पोलिसांना अपयश आलंय.
पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलाय
बदलापूर रेल्वे स्थानकात परिस्थिती जैसे थे आहे. आज सकाळपासून आंदोलकांनी रेल्वे स्थानकांवर जमण्यास सुरुवात केली होती. अद्याप आंदोलक मागे हटलेले नाहीत. पोलिसांसह सर्व यंत्रणा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र,मात्र आंदोलक हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलाय. आजूबाजूच्या शहरातील पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
एकनाथ शिंदे यांची पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा
बदलापूर मधील शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय गंभीर दखल घेतली आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. बदलापूर येथील प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली आहे. अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला असून सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले.