बदलापुरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बदलापूरमध्ये नामांकित कंपन्यांच्या बिस्किटांमध्ये अळ्या आणि किडे आढळले आहेत. एक्सपायरी डेट झालेली नसतानाही बिस्किटात किडे आणि अळ्या आढळल्या आहेत. दुकानदाराने कंपनीकडे बोट दाखवत हात वर केले आहे. बदलापूरमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , हे बिस्किटं एका चिमुकलीने खाल्ल्यानं पालक चिंतेत असून दुकानदारानं कंपनीकडे बोट दाखवत हात वर केल्यानं पालकांनी संताप व्यक्त केलाय.
बदलापूरच्या बेलवली परिसरात राहणाऱ्या कृष्णा गोस्वामी यांनी मुलींसाठी परिसरातल्याच एका दुकानातून नामांकित कंपनीचे बिस्कीट पुडे विकत घेतले होते. या बिस्किटांवर एप्रिल २०२५ ची एक्सपायरी डेट आहे. घरी गेल्यावर त्यांच्या मोठ्या मुलीनं चार बिस्किटं खाल्ली आणि ती शाळेत गेली. तर लहान मुलीला बिस्किटं देत असताना त्यात किडे असल्याचं गोस्वामींच्या लक्षात आलं. दुकानदाराला दाखवल्यानंतर त्यानं कंपनीकडे बोट करत हात वर केले.
बिस्किटामध्ये किडे-अळ्या आढळल्याचं समोर आल्यानंतर संबंधित दुकानदाराला ही बाब दाखवली. दुकानदाराने बिस्किटांची एक्सपायरी डेट झालेली नसल्याचं सांगत कंपनीकडे बोट दाखवलं. याबाबत डीलर आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, पण ग्राहकांना कंपनीच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधायला सांगा असं उत्तर कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलं. या प्रकारामुळे बदलापूरमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या सगळ्या प्रकारानंतर गोस्वामी यांनी संताप व्यक्त केला. कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नसून अशा प्रकारामुळे जर एखाद्या लहान मुलाला त्रास झाला, तर कोण जबाबदारी घेणार? असा सवाल त्यांनी केला. तसंच याबाबत पालिकेकडे तक्रार केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. चिमुकलीने ते बिस्किट खाल्ल्यानं पालक चिंतेत आहेत, त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.