मुंबई : बदलापूर प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याची पोलीस कोठडी संपली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला कल्याण कोर्टामध्ये हजर केले होते. यावेळी न्यायमूर्तींनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दीपक केसरकर यांनी दिली महत्त्वाची माहिती
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बदलापूरमधील घटनेची दखल घेऊन महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ते म्हणाले की, काल कॅबिनेट मध्ये सविस्तर चर्चा झाली. आदिवासी शाळा यांच्यावर कंट्रोल नसतं, त्यामुळे त्या शिक्षण विभागाकडे देण्यात यावे असं सांगितले आहे. पॅनिक बटण महिलांना शाळा व इतर ठिकाणी देण्यात येणार आहे.
पॅनिक बटणमुळे ताबडतोब पोलिसांना माहिती जाते व त्याची ट्रॅकिंग सिस्टम आहे. हे डिवाईस नेटवर्क नसलं तरी चालते. हे जर आम्ही देऊ शकलो तर निश्वितणे महिला अत्याचार कंट्रोलमध्ये येईल. हा एक चांगला उपक्रम राबवणार आहोत, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
बदलापूरच्या एक नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अक्षय शिंदे हा पंधरा दिवसांपूर्वी शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाला होता. त्याने दोन चिमुकलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. चिमुकलींनी आपल्या आई-वडिलांना याची माहिती दिली होती. त्यानंतर आई-वडिलांनी पोलीस तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी शाळा प्रशासन, पोलीस यांच्याकडून प्रचंड निष्काळजीपणा झाला होता. त्याचा उद्रेक बदलापूरमध्ये पाहायला मिळाला होता.