ठाण्यात एका कंपनीला आग लागून एकापाठोपाठ 15 सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.कंपनीला आग लागताच एकापाठोपाठ एक अशा तब्बल 15 सिलेंडरचा स्फोट झाला असून, परिसरातील नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात कंपनीला ही आग लागली आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली? या आगीत कितपत नुकसान झालं आहे , घटनेत कुणी जखमी झाले आहे का? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण आगीत संबंधित कंपनी जळून खाक होताना दिसत आहे. गेल्या तीन तासांपासून ही आग धुमसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरात वागळे इस्टेट परिसरात असणाऱ्या एका चिप्सच्या कंपनीला ही आग लागली आहे. व्यंकट रमण फूड कंपनी असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीत चिप्स आणि कुरकुरे निर्माण केले जातात. या कंपनीत वेफर आणि पुठ्ठ्यांना आग लागली आहे. ही आग प्रचंड भडकली आहे. आग लागल्यानंतर एकापाठोपाठ तब्बल 15 सिलेंडरच्या स्फोटाचे आवाज आला. त्यामुळे परिसरातील नागरीक भयभीत झाले.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. पण आग विझवण्यात अद्यापही यश आलेलं नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत 10 अग्निशमन बंब आणि 8 टँकर घटनास्थळी आणण्यात आले आहेत. पण आग विझायचं नाव घेताना दिसत नाहीय. त्यामुळे परिसरातील नागरीकदेखील भयभीत झाले आहेत. दरम्यान, घटनेचं गांभीर्य ओळखून आणि संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी आगीच्या आजूबाजूचा परिसर रिकामा केला आहे. तसेच विद्युत लाईन देखील बंद ठेवण्यात आली आहे.