गोरगरीब महिलांच्या अंडाशयाचीच तस्करी, एका अंडाशयामागे २० हजार रुपये, कुठे घडला संतापजनक प्रकार ?
गोरगरीब महिलांच्या अंडाशयाचीच तस्करी, एका अंडाशयामागे २० हजार रुपये, कुठे घडला संतापजनक प्रकार ?
img
वैष्णवी सांगळे
बदलापूर पुन्हा एकदा हादरलं आहे. बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी तीन महिलांना अटक केली असून मुख्य सूत्रधार महिलेच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.

बदलापूरमध्ये महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केल्याप्रकरणी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधल्यानंतर उघडकीस आला आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगानं तपासाची चक्रं फिरवली. यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ज्युवेली गावात राहणाऱ्या सुलक्षणा गाडेकरसह उल्हासनगरातील तिची साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे या ३ महिलांना अटक केली. 

ही महिला बदलापूरमधील गोरगरिब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे अंडाशय विकण्यास भाग पाडत होती. माहितीनुसार या प्रकरणात ३०० हून अधिक महिला पीडित आहे. या सर्व महिलांना अंडाशयामागे २० हजार रुपये दिले जात होते. तर मध्यस्थ महिलांना प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात येत होते अशी माहिती उघड झाली आहे. या अंडाशयांची केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विक्री केली जात होती. 

या अंडाशय तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेली मुख्य सूत्रधार सुलक्षणा गाडेकर ही बदलापुरातल्या खरवईतील नॅनो सिटीत राहत होती. महिनाभरापूर्वीच ती याठिकाणी राहण्यास आली होती. पोलिसांनी या महिलेच्या घराची झडती घेतली असता संशयास्पद इंजेक्शन सापडले. पोलिसांनी गाडेकरच्या घरातून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.

गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकरने आपल्या घरातच साठवले होते. ती महिला गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून हे इंजेक्शन्स देत होती. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करून घ्यायची. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची. तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचे. त्यानंतर त्याची सऱ्हासपणे विक्री करण्यात येत होती.


इतर बातम्या
Join Whatsapp Group