दैनिक भ्रमर - रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद शिगेला पोहोचला असताना, आता 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार याबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे. १५ ऑगस्ट स्वातत्र्य दिनी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची अधिकृत यादी आता समोर आली आहे.
मंत्री भरत गोगावले हे ध्वजारोहणासाठी उत्सुक होते, यावेळी ध्वजारोहणाची संधी मला मिळेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र यावेळी देखील ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांनाच मिळाला आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे विरुद्ध शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यात संघर्ष आहे.
तर नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन विरुद्ध शिवसेनेचे दादा भुसे असा वाद आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार रायगडमध्ये अदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन हेच ध्वजारोहण करणार आहेत.
तर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यंदा ध्वजारोहनासाठी बीडला जाणार आहेत. त्यामुळे, पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडणार आहे.