नाशिक लोकसभा निवडणुकीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या मतदारसंघात अद्याप महायुतीकडून उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. अशातच या मतदारसंघात शांतीगिरी महाराजांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी मारत सोमवारी अर्ज दाखल केला.
शांतीगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा होती पण त्यांना पक्षाकडून अद्याप एबी फॉर्म मिळालेला नाही. अशामध्ये भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी आज शांतीगिरी महाराजांसोबत चर्चा केली. पण काहीच फायदा झाला नाही कारण शांतीगिरी महाराज हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
गिरीश महाजन यांनी आज शांतीगिरी महाराजांसोबत चर्चा केली. पण ही चर्चा निष्फळ ठरली. कारण निवडणूक लढवण्यावर शांतीगिरी महाराज ठाम आहेत. महायुतीकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे शांतीगिरी महाराज यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे शांतीगिरी महाराज हे निवडणूक माघार घेणार नसून ते कुठल्याही परिस्थीतीत निवडणूक लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
यावेळी भाजपकडून उमेदवारी देणं सध्या शक्य नसल्याचे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. मात्र महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपण उभे राहावं अशी विनंती गिरीश महाजन यांनी शांतिगिरी महाराजांकडे केली. त्याचसोबत येत्या दोन दिवसांत महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटेल असा दावा गिरीष महाजनांनी केला.
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. सोमवारी शांतीगिरी महाराज यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भव्य मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये भव्य रॅली काढली होती. शांतीगिरी महाराजांनी महायुतीकडून उमेदवारी दाखल केल्याची चर्चा रंगली होती. पण अजूनपर्यंत मला कोणत्याही पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळाला नाही. त्यामुळे सध्या माझा अर्ज अपक्ष आहे.', असे शांतीगिरी महाराजांनी सांगितले होते.