नागपूरच्या गुन्हेगारी जगतातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडी ड्रग्ज तस्करी करताना पोलिसांनी अटक केली आहे.
या धडक कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून १.६७ लाख रूपयाच्या एमडी पावडरसह १८.१७ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ड्रग्ज विक्री प्रकरणात माजी नगरसेवकाच्या मुलाचे नाव समोर आल्यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा संकेत बुग्गेवार हा जिम ट्रेनर असून, बॉडी बिल्डर आहे. संकेतनं २०२२ साली दिल्ली येथे बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशिपमध्ये सुर्वणपदक तसेच मिस्टर इंडिया टायटल जिंकले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संकेत एमडी ड्रग्जची डिलिव्हरीसाठी जात होता. तो गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रेस्टॉरंटजवळ येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
गणेशपेठ पोलिसांनी रात्रीच सापळा रचला होता. संकेत आपल्या कारमधून आला. पोलिसांनी त्याला अडविले. नंतर त्याच्या कारची झडती घेतली.
दरम्यान, पोलिसांना त्याच्या खिशातून १६.०७ ग्राम एमडी पावडरसह १८.१७लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. नंतर पोलिसांनी संकेतला ताब्यात घेतलं. तसेच पोलिसांकडून तपास सुरू आहे. ड्रग्ज विक्री प्रकरणात माजी नगरसेवकाच्या लेकाचे नाव आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.