सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अंजू कृष्णा हिला चेन्नईमध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीकडे अमली पदार्थ (ड्रग्ज) सापडले आहेत. अंजू कृष्णासह इतर सात लोकांना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अंजू कृष्णा, असिस्टेंट डायरेक्टर विन्सी निवेधा, कार्तिक राजा, यशवंत, श्रीराम, अल्विबिनशा आणि व्यंकटेश कुमार यांचा समावेश आहे. माहितीनुसार, अँटी-नार्कोटिक्स इंटेलिजन्स युनिटच्या (ANIU) साऊथ टीमने वलसरवक्कम भागात छापा टाकला. छाप्यात ६ ग्रॅम मेथामफेटामाइन, ७ ग्रॅम ओजी गांजा, १५ ग्रॅम भांग, एक एलएसडी (LSD) स्टॅम्प आणि ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
३१ वर्षीय अंजूने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. IMDb नुसार, तिने 'आकाशम कडन्न', 'आरो' आणि 'ओम वेल्लिमालई' सारख्या चित्रपटांत अभिनय केला. अंजू कृष्णाच्या अटकेबाबत चित्रपटसृष्टी आणि सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक तिला दोषी ठरवत आहेत, तर काही जण कायदेशीर प्रक्रियेची वाट पाहण्याचा सल्ला देत आहेत. ANI युनिटचे अधिकारी सध्या तपास करत असून अटक केलेल्या सर्वांची चौकशी सुरू आहे. अंजू कृष्णाच्या अटकेमुळे चित्रपटसृष्टीतील ड्रग्जशी संबंधित चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.