नाशिक : मुंबई क्राईम ब्रँच, सोलापूर ग्रामीण पोलिसानंतर नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सोलापूर अमली पदार्थांचे केंद्रबिंदू बनत चालले असून नाशिक पोलिसांनी सोलापुरात कोट्यवधी रुपयांच्या एमडीचा साठा जप्त केला आहे. एमडीचा कारखानाच उध्वस्त करण्यात आला असून अमली पदार्थ आणि कच्च्या मालाचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ३ पासून शुक्रवारी रात्री ११ पर्यंत नाशिक पोलिसांच्या तीन पथकांकडून ही कारवाई सुरू होती. श्री स्वामी समर्थ केमिकल्स कंपनीत हा अवैधधंदा सुरू होता. दरम्यान कंपनीतील संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन नाशिक पोलीस खुलासा करणार आहेत.
मुंबई क्राईम ब्रँच ने सोलापुरातील चिंचोली एमआयडीसीमध्ये कारवाई केल्यांनतर आता नाशिक पोलिसांनी चंद्रमोळी औद्योगिक वसाहतीतील श्री स्वामी समर्थ केमिकल्सवर कारवाई केली आहे. नाशिक पोलिसांची तीन पथकं वेषांतर करून या परिसरात दाखल झाली होती.सोलापुरात काही वर्षांपूर्वीही अमली पदार्थ विरोधात अशाच प्रकारच्या कारवाई करण्यात आल्या होत्या. त्यांनतर आता मुंबई क्राईम ब्रँचने कारवाई केली तर कालच सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली होती .
आता या प्रकरणांमध्ये पोलिसांच्या हाती काही वेगळे धागेदोरे हाती लागले आहेत. आणि आजच मुंबई क्राईम ब्रँचने सोलापूर मधिल संशयित आरोपीला हैद्राबादमधून ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे अमली पदार्थांची लिंक आता सोलापूर, नाशिक, मुंबई, हैद्राबाद पर्यंत पोहोचली आहे.