मल्याळम सिनेसृष्टीत सध्या बरीच खळबळ माजत असल्याचं पाहायला मिळतंय. हेमा समितीकडून मल्याळम सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींचं लैंगिक शोषण होत असल्यासंदर्भात अहवाल समोर आला होता. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांनी आता AMMS म्हणजेच ‘असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
हेमा समितीचा अहवाल आल्यानंतरही त्यांनी मौन धारण केलं होतं. पण आता त्यांच्यासह या समितीमधील अन्य काही सदस्यांनी देखील त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
काही वर्षांपूर्वी बॉलीवुडमध्ये ज्याप्रकारे मी टू मुव्हमेंट झाली, त्याप्रमाणे आता मल्याळम सिनेविश्वातूनही अभिनेत्रीच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे सध्या मल्याळम सिनेसृष्टीमधलं वातावरण चांगलच बिघडलं असल्याचं चित्र आहे.
याआधही अभिनेत्रीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर रविवार 25 ऑगस्ट रोजी अभिनेते सिद्दीकी यांनी रविवारी AMMA च्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या केरळ पाठोपाठ चलचित्र अकादमीचे अध्यक्ष रंजित यांनीही राजीनामा दिल्याची माहिती समोर आली.
या सदस्यांनी दिला राजीनामा
अभिनेते मोहनलाल यांच्यासह उपाध्यक्ष जयन चेरथला आणि जगदीश, खजिनदार उन्नी मुकुंदन न्सीबा हसन, सहचिव बाबूराज यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कार्यकारी समितीच्या सदस्य न्सीबा हसन, सरयू मोहन, विनू मोहन, टिनी टॉम, अनन्या, सुरेश कृष्णा, कलाभवन शाजोन, सूरज वेंजारामूडू, जोमोल, जॉय मॅथ्यू आणि टोव्हिनो थॉमस यांनी राजीनामा दिला आहे.
राजीनाम्याचंही कारण समोर
या संपूर्ण प्रकारानंतर अध्यक्ष मोहनलाल यांनी कोणत्याही प्रकारचं भाष्य करणं टाळलं. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही बरीच चर्चा झाली. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्ष मोहनलाल यांच्यासह 17 जणांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर केरळ सरकारनेही अभिनेत्रींनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमली आहे. यामध्ये एकूण 7 सदस्यांचा समावेश आहे.