संपूर्ण राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला वेग आला आहे. मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी भाजपा शर्थीचे प्रयत्न करत आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत महापालिका निवडणुका होणार असून १६ जानेवारीला निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता येणार हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल.
भाजपाकडून काही उमेदवारांना मुंबई महापालिका निवडणुकीचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशा परुळेकरलाही भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून जाहीर करणाऱ्या अनुभवी नगरसेवक आणि उमेदवारांच्या ताफ्यात मनोरंजन विश्वातील अभिनेत्रीचं नाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोण आहेत अभिनेत्री निशा परुळेकर?
निशा परुळेकर हे मराठी कलाविश्वातील मोठं नाव आहे. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. 'काळुबाई पावली नवसाला', 'अशी होती संत सखू', 'सासूच्या घरात जावयाची वरात', 'पोलीस लाईन', 'हरी ओम विठ्ठला', 'तीन बायका फजिती ऐका' हे तिचे गाजलेले सिनेमे. 'सही रे सही' या नाटकात तिने भरत जाधव यांच्यासोबतही काम केलं होतं. तसेच महानायक व शिमणा या दोन चित्रपटांमध्येही भूमिका साकारली होती. शिवाय महेश कोठारे व्हिजन निर्मित दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेत त्यांनी महालक्ष्मी अंबाबाईचे पात्र साकारले होते.
अभिनयाच्या क्षेत्रात अनेक वर्ष काम केल्यानंतर तिने भाजपचं कमळ हाती घेतले आहे. रंगमंचावर, तसेच मोठ्या व छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर आता अभिनेत्री निशा परुळेकर राजकारणाच्या रिंगणात नशीब आजमावणार आहेत. अभिनेत्री निशा परुळेकर यांना प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे. भाजपकडून त्या महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजप सांस्कृतिक प्रकाशच्या सहसंयोजक म्हणून सध्या त्या भाजपमध्ये काम करत आहेत.