छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जास्मिन भसीन ही मुख्यत: मालिकांमधून ओळखली जाते. जास्मिन हिने 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी' या टीव्ही शोद्वारे आपली ओळख चाहत्यांमध्ये निर्माण केली. 'टशन-ए-इश्क', 'दिल से दिल तक', 'नागिन', या मालिकांमध्ये जास्मिनने काम केले आहे. यामुळे जास्मिनचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. अभिनयासोबतच जास्मिन एक उत्तम मॉडल देखील आहे. नुकतीच जास्मिनबद्दल एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.
अभिनेत्री जास्मिन भसीनच्या डोळ्याला लेन्स लावल्यामुळे गंभीर इजा झाल्याची बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या डोळ्यांना दुखापत झाली असून तिला लेन्स लावल्यामुळे दिसणंही बंद झालेलं आहे.
जास्मिनने दिलेल्या माहितीनुसार, "१७ जुलैला मी दिल्लीला एका कार्यक्रमासाठी गेली होती. मी कार्यक्रमाला जाण्यासाठी डोळ्याला लेन्स लावल्या होत्या. लेन्स लावल्यानंतर अचानक माझ्या डोळ्यांना जळजळ होऊ लागली. मी लगेचच डॉक्टरांकडे जायला हवं होतं. पण माझ्या काही कामामुळे मला डॉक्टरांकडे जायला जमलं नाही. मी आधी कार्यक्रमाला जायचं ठरवलं आणि नंतर पुढे डॉक्टरांकडे जायचं ठरवलं होतं. मी संपूर्ण कार्यक्रमात सनग्लासेसच घालून होते."
"काही काळानंतर मला अचानक दिसू न लागल्यामुळे माझ्या टीमने मला संपूर्ण कार्यक्रमात खूप मदत केली. त्या कार्यक्रमावरून घरी परतल्यानंतर मी लगेचच नेत्ररोग तज्ज्ञांकडे गेले. डॉक्टरांनी सांगितले की, डोळ्यांचा कॉर्निया खराब झाला आहे. यानंतर डोळ्यांवर पट्टी लावण्यात आली." सध्या अभिनेत्री मुंबईत परतली असून तिच्यावर मुंबईत पुढील उपचार केले जाणार आहेत. अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या डोळ्याला अजूनही खूप वेदना होत आहेत.
"सध्या व्यवस्थित उपचार सुरू असून डोळ्यांना खूप वेदना होत आहेत. येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये मी बरी होईल असं मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. येत्या पुढचे काही दिवस मला डोळ्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागणार आहे. डोळे दुखत असल्यामुळे मला काहीही दिसत नसून मला रात्री झोपतानाही खूप त्रास होत आहे. " असं अभिनेत्रीने सांगितले आहे.
अलीकडेच जास्मिन आणि तिचा बॉयफ्रेंड अली गोनी हे दोघंही ‘लाफ्टर शेफ’ शोमध्ये एकत्र आले होते. यामध्ये त्या दोघांनीही एकत्र स्वयंपाकही बनवला. त्याशिवाय अभिनेत्री रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी १४’ या शोमध्येही दिसणार आहे.